जुन्नर वन विभाग

जुन्नर वन विभाग: नैसर्गिक संपदेचे संरक्षण, वन्यजीवांचे व्यवस्थापन, आणि स्थानिक जीवनस्तर सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून e-governance द्वारे सुलभ प्रशासन आणि पर्यावरणीय संरक्षण. | झाडे, प्राणी व पक्ष्यांचा माहितीसोबत वन्यजीव सप्ताह साजरा | जुन्नरच्या सडे पठरांचा माथेरानच्या धर्तीवर संवर्धन आराखडा

श्री ब्रह्मनाथ देवस्थान, पारुंडे

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील पारुंडे गावात वसलेले श्री ब्रह्मनाथ देवस्थान हे प्राचीन आणि अतिशय सुंदर कोरीवकामाने अलंकृत असे मंदिर आहे. हे मंदिर आपल्या स्थापत्यकलेमुळे आणि नाथ संप्रदायाच्या प्रभावामुळे विशेष प्रसिद्ध आहे. पारुंडे गाव, जो शांत आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला आहे, या मंदिराच्या आकर्षकतेने अधिकच प्रसिध्द झाले आहे. मंदिराची उंची सुमारे ८६० मीटर आहे, आणि ते गावातील प्रमुख ग्रामदेवस्थान म्हणून ओळखले जाते.

 श्री ब्रह्मनाथ मंदिर हे पारुंडे गावात, जुन्नरच्या पायथ्याशी स्थित आहे. हे गाव जुन्नरपासून जवळच असून, येथील निसर्गरम्य वातावरण आणि मंदिराचा ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना आकर्षित करते.

इतिहास

मंदिराच्या स्थापनेचा इतिहास बाराव्या-तेराव्या शतकातील आहे, जेव्हा नाथपंथीय संन्यासी बाबा ब्रह्मनाथ यांनी येथे आपली समाधी घेतली. शिलाहार राजवंशातील झंझ आणि त्यांच्या वंशजांनी गोदावरी आणि भीमा नदीच्या उगमाजवळ बांधलेल्या बारा शिवमंदिरांच्या परंपरेत हे मंदिर बांधले असल्याचे मानले जाते.

पारुंडे गावाच्या नावाचा उगम ‘पराशर ऋषी’ यांच्याशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, पराशर ऋषींनी या ठिकाणी शेतीचा अभ्यास करून कृषी पराशर हा ग्रंथ तयार केला होता.

स्थापत्यकला आणि शिल्प: श्री ब्रह्मनाथ मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला यांमध्ये नाथ संप्रदायाच्या योगाभ्यासाचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आणि बाबा ब्रह्मनाथ आणि बाबा ज्वालानाथ यांचे मुखवटे आहेत. मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे दगडी खांबांवर उभारलेले आहेत, ज्यावर कोरलेले नक्षीकाम अत्यंत सुंदर आणि जिवंत आहे.

सभामंडपातील सहा खांबांवरील शिल्पकला नाथ संप्रदायाच्या विविध आसनांमध्ये, मुद्रांमध्ये, आणि नृत्यमुद्रांमध्ये योगाभ्यासाची साक्ष देतात. उर्ध्व धनुरासन, नटराजासन, गरुडासन, नौकासन, गोमुखासन, अनंतासन, आणि सुखासन यांसारख्या योगमुद्रा खांबांवर कोरलेल्या आहेत, ज्या तत्कालीन योगाभ्यासाचा इतिहास आणि परंपरा दर्शवतात.

पारुंडे गावातील यात्रा आणि उत्सव: पारुंडे गावात दर वर्षी श्रावणी सोमवारी मोठ्या उत्साहाने श्री ब्रह्मनाथ देवाची यात्रा साजरी केली जाते. श्रावण महिन्यात तीन सोमवारी या देवाची पालखी फुटकड्यावर्ती नेली जाते. यात्रेच्या दिवशी, आसपासच्या गावांतून आणि दूरवरून भक्तगण गाड्या घेऊन येथे येतात, आणि उत्सवाचे आनंद घेतात.