छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी अर्थात जुन्नर– शिवनेरी प्राचीन ते अर्वाचीन अशी इतिहासाची समृद्ध परंपरा असलेला तालुका, इतिहास, पर्यटन किल्ले, ट्रेकिंग, निसर्गसंपदा, वैविध्यपूर्ण जैवसंपदा, लेणी, विविध पशू, पक्षी, प्राणी, बिबट्या अशा विविध गोष्टींनी युक्त असलेला हा तालुका. देश–विदेशांतून अनेक पर्यटक जुन्नर पाहण्यासाठी अभ्यासासाठी येत असतात. त्यांना जुन्नरविषयक अचूक आणि परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी वनविभागाने ‘जुन्नर तालुका पर्यटन’ हा ग्रंथ काढण्याचे निश्चित केले ही गोष्ट जुन्नर पर्यटनासाठी अर्थपूर्ण आहे. या ग्रंथात जुन्नरचा सातवाहन काळापासूनचा इतिहास, किल्ले, लेणी, घाटवाटा, जलपर्यटन, वर्षा, साहसी, धार्मिक आणि तालुक्यातील बहुतांश पर्यटनस्थळांचा पुराव्यांसह इतिहास मांडला आहे. हा केवळ इतिहास नव्हे तर एका अर्थाने जुन्नर तालुक्याची ही जीवनगाथा आहे. जुन्नर वनविभागाच्या वतीने साकार होत असलेल्या या प्रकल्पाचे मनापासून स्वागत करतो. अनेक अनभिज्ञ असलेल्या पर्यटनस्थळांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, तो मार्गदर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जुन्नर वनविभागाने आयोजित केलेले गाइड प्रशिक्षण शिबिर म्हणजे प्रशंसनीय बाब होय, शासकीय पातळीवरून झालेला हा प्रयत्न अतिशय यशस्वी झाला. या शिबिरामधून पर्यटक मार्गदर्शक तयार झाले, त्यांना शासकीय मान्यता व प्रमाणपत्र देण्यात आले. वनविभाग आणि पर्यटक मार्गदर्शक दोघांसाठी ही गोष्ट अर्थपूर्ण आहे. या अर्थपूर्ण उपक्रमामधून वनविभाग जुन्नर यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे..
‘जुन्नर तालुका पर्यटन’ या ग्रंथामध्ये लिहिलेले सर्व लेख मान्यवर लेखकांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने व अचूकतेने मांडले आहेत. ग्रंथाचे प्रकाशन स्वतः वनविभाग जुन्नर यांनी केले आहे. उत्तम बांधणी, आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्ठ, पुस्तकातील मजकुराची आशयघनता, अचूकता, आंतरविद्याशाखीयता, ग्रंथांचे अंतरंग व बहिरंग रूप अतिशय उत्तम आहे. हा ग्रंथ जुन्नर पर्यटक मार्गदर्शकांना निश्चित उपयुक्त ठरेल.’